वडूज पोलीसांकडून अवैध देशी दारुविरोधात धडक कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वडूज दि.7 : गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वडूज पोलीसांनी कारवाई करत सुमारे 77 हजार रुपये किंमतीचा अवैध देशी दारुचा साठा जप्त केला आहे.

याबाबत वडूज पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.5 जून रोजी वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना किरण दत्तात्रय जाधव (रा.वडूज, ता.खटाव) हा पिकअप गाडीतून बेकायदेशीररित्या देशी दारुची वाहतूक करीत असल्याची खबर गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. सदर खबरीनुसार सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, पोलीस हवालदार दादासाहेब देवकुळे, दिपक देवकर, आण्णा मारेकर, भुषण माने, सागर बदडे, दर्‍याबा नरळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता जगदाळे यांनी मौजे सातेवाडी कॉर्नर या ठिकाणी खाजगी वाहनातून जावून सापळा रचून बेकायदेशीर दारु वाहतूक करणारा पिकअप चालक अजित सुखदेव बुरंगले (रा.गणेशवाडी, ता.खटाव) याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्या सोबत असलेला किरण दत्तात्रय जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या कारवाईत 22 बॉक्स देशी दारु (किंमत रु.63,360) व एक पांढर्‍या रंगाची पिकअप असा एकूण 4 लाख 63 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान संबंधित फरारी आरोपी किरण दत्तात्रय जाधव यांच्या वडूज (ता.खटाव) येथील राहत्या घरी आडोशाला आणखी दारुचा साठा असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जावून पोलीस कर्मचारी बेकायदेशीर खाके रंगाचे देशी दारुचे 5 बॉक्स किंमत रुपये 14 हजार 400 चा माल व रोख रक्कम 15 हजार 470 असा एकूण 29 हजार 870 चा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार राहुल सरतापे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!