स्थैर्य, दि.१३: केंद्र सरकारने कोरोनाची लस
टाेचण्याच्या नियोजनात आणखी एक पाऊल टाकले आहे. आरोग्य मंत्रालयाने
लसीकरणाशी संबंधित अॉपरेशनल गाइडलाइन्स जाहीर केली आहे. राज्यांना
पाठवलेल्या ११३ पानांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लस येण्याआधीची तयारी,
लाभार्थींची नोंदणी, लस आल्यानंतर ती कशी टोचली जाईल, कोण टोचेल… याबाबत
माहिती देण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची प्रक्रिया
निवडणुकीसारखी असेल. प्राधान्यानुसार निवडण्यात आलेल्यांनाच लस दिली जाईल.
एका बूथवर एका सत्रात (दिवसात) १०० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण होणार
नाही. देशात एकूण किती बूथ असतील हे अद्याप निश्चित होऊ शकले नाही. याबाबत
राज्यांकडून केंद्र माहिती मागवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दहा
दिवसांत एक किंवा दोन लसींना केंद्र मंजुरी देईल. जानेवारी २०२१ च्या
सुरुवातीला लसीकरणास सुरुवात होऊ शकते. केंद्र, राज्य, जिल्हा आणि तालुका
पातळीवर देखरेख ठेवली जाईल.
लसीकरणादरम्यान
आवश्यक वैद्यकीय सेवा आणि आधीपासून सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमात
व्यत्यय येणार नाही. एखाद्या विपरीत प्रसंगासाठी म्हणजे लस दिल्यानंतरच्या
समस्येवर देखरेखीसाठी सध्याच्याच यंत्रणेचा वापर केला जाईल. अशा स्थितीत
तपासणी करणे आणि ती दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असेल.
ज्या लोकांना लसीकरणासाठी निवडले जाईल त्यांना आधी सांगितले जाईल, ऑन द स्पॉट नोंदणी नसणार
आधी कोणाला लस?
सर्वात
आधी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना लस दिली जाईल. यानंतर ५०
वर्षांवरील लोकांना, त्यानंतर गंभीर आजार असणाऱ्या ५० वर्षांपेक्षा कमी
वयाच्या लोकांना. यानंतर उर्वरित महामारीचा प्रसार आणि लसीच्या
उपलब्धतेच्या आधारे लसीकरण होईल.
नोंदणी कशी होणार?
नुकत्याच
झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आकड्यांच्या आधारे ५०
वर्षांच्या वरील लोकांची नोंदणी होईल. को-विन (कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स
नेटवर्क) डिजिटल प्लॅटफाॅर्मद्वारे नोंदणीकृत लोकांना ट्रक केले जाईल.
कोणाला लस दिली आणि कोण राहिले याबाबत या प्लॅटफाॅर्मवर रिअल टायमिंग
मॉनिटरिंग होईल. फक्त प्राथमिकतेच्या आधारे आधीपासून नोंदणी झालेल्यांचे
लसीकरण होईल. ऑन द स्पॉट नोंदणी होणार नाही.
लस कशी देणार?
यासाठी
आधीपासून निश्चित वेळी लसीकरण केले जाईल. एका दिवसात १०० जणांना लस दिली
जाईल. आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी निश्चित ठिकाणी लसीकरण
केले जाईल. मात्र, उर्वरित लोकांसाठी त्यांच्या भागात नजीकच्या ठिकाणी
किंवा मोबाइल लॅबद्वारे लसीकरण होईल. राज्य त्यांच्या हिशेबाने लसीकरणाचा
दिवस व वेळ ठरवतील.
पूर्ण प्रक्रिया कशी असेल?
राष्ट्रीय पातळीवर…
नॅशनल
एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड- १९ (नेगवॅक)ची
स्थापना करण्यात आली आहे. यात अध्यक्ष नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि
सहअध्यक्ष आरोग्य सचिव असतील. तसेच परराष्ट्र मंत्रालय, बायो टेक्नॉलॉजी
विभाग, आरोग्य संशोधन विभाग, फार्मा विभाग, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे
सचिव, डीजीएचएस, एम्स दिल्लीचे संचालक, एनएआरआयचे संचालक, अर्थ मंत्रालय व
एनटीजीएआयचे प्रतिनिधी व देशाच्या सर्व भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५
राज्यांचे प्रतिनिधी त्यात सदस्य असतील. हा गट लसीची चाचणी, वाहतूक,
दुसऱ्या देशांसोबत समन्वय, विविध परवानग्या, लाभार्थींच्या निवडीवर देखरेख
इत्यादी पूर्ण काम बघेल.
राज्य पातळीवर…
राज्य
सुकाणू समिती असेल. अध्यक्ष मुख्य सचिव असतील. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव
संयोजक असतील. राज्याचे विविध विभाग, संस्थांचे प्रतिनिधी सदस्य असतील. ही
टीम लसीकरण करणाऱ्यांचे प्रशिक्षण व लाभार्थींची नोंदणी करेल.
मायक्रोप्लॅनिंग व मॉनिटरिंगही करेल. एक स्टेट टास्क फोर्स असेल. मुख्य
सचिव (आरोग्य) किंवा अतिरिक्त मुख्य सचिव अध्यक्ष असतील. ही टीम को-विन
प्लॅटफॉर्मच्या डेटाबेसची देखरेख, जिल्ह्यांना मदत, देखरेख करेल. तसेच
राज्य नियंत्रण कक्ष असेल, जो चोवीस तास कार्यान्वित राहील.
जिल्हा पातळीवर…
जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेत जिल्हा कार्य बल आणि शहरी भागात मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेत
शहरी टास्क फोर्स व नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहील.
तालुका पातळीवर…
एसडीएम
किंवा बीडीआेंच्या अध्यक्षतेत तालुका टास्क फोर्स व तालुका नियंत्रण कक्ष
कार्यान्वित राहील. लसीकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि
तैनातीचे काम ग्राउंड लेव्हलवर हीच टीम करेल.
लस कोण देणार
लसीकरणाची प्रक्रिया निवडणुकीसारखी असेल. प्रत्येक लसीकरण पथकात ५ सदस्य असतील.
व्हॅक्सिनेशन ऑफिसर-1
ज्याला इंजेक्शन देता येते तो डाॅक्टर, नर्स, फार्मासिस्ट, एएनएम वा आरोग्यसेवक असेल.
व्हॅक्सिनेशन ऑफिसर-2
तो
पोलिस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, एनसीसी, एनएसएस वा एनवायकेचा एखादा
सदस्य असेल जो एंट्री पॉइंटवर रजिस्ट्रेशनची तपासणी करेल व प्राथमिकतेच्या
आधारे नाेंदणी झालेल्यालाच लस दिली जावी हे ठरवेल.
व्हॅक्सिनेशन ऑफिसर-3
ती व्यक्ती जी लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थीची कागदपत्रे बघून पडताळणी करेल.
व्हॅक्सिनेशन ऑफिसर- 4/5
हे दोन्ही सपोर्ट स्टाफ म्हणून काम करतील. गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि लस देणाऱ्याची मदत करणे हे मुख्य काम असेल.