दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धुळे शहरात मोबाईल वरून शहरातील मुलींचे छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढण्याविषयी तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्याची सूचना केंद्राला पाठविण्यात येणार आहे.राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य रईस शेख, प्रा.वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.