दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व रेशनिंग कार्ड अद्ययावत करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून रेशनिंग कार्ड अद्ययावत म्हणजेच ऑनलाईन नसलेल्या नागरिकांनी आपले रेशनिंग कार्ड अद्ययावत म्हणजेच ऑनलाईन करुन घ्यावे. याबाबत कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास पुरवठा शाखा, तहसीलदार कार्यालय येथे संपर्क साधावा; असे आवाहन तहसिलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर बोलताना तहसिलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी सांगितले की, आज अखेर फलटण तालुक्यात 69 हजार 923 रेशनिंग कार्ड अद्ययावत करण्यात आली असून या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची संख्या 2 लाख 88 हजार 649 इतकी आहे. यामध्ये अंत्योदय 4 हजार 64 रेशनिंग कार्ड कुटुंबे (लाभार्थी संख्या 17 हजार 786), प्राधान्य कुटुंब 38 हजार 67 रेशनिंग कार्ड कुटुंबे (लाभार्थी संख्या 17 हजार 1 लाख 57 हजार 82), एनपीएच 27 हजार 792 रेशनिंग कार्ड कुटुंबे (लाभार्थी संख्या 1 लाख 13 हजार 781) आहेत. सदरील लाभार्थ्यांना फलटण तालुक्यातील 161 स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण होत आहे.