स्थैर्य, पुणे, दि.४: भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आणि त्याचवेळी मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत नवीन राजकीय वाटचाल सुरू केली. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भाजप व मनसे युतीच्या चर्चा झडू लागल्या.या मुद्द्यावर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर वेळोवेळी मते देखील व्यक्त केली. पण आता भाजपने मनसेसोबतच्या युतीची आपली भूमिका जाहीर केली आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मनसे सोबतच्या युतीबाबत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.पाटील म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची चर्चा करण्यात आलेली नाही.
भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महापौर मुरलीधर मोहोळ व पक्षाच्या नगरसेवकांसह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांवर चर्चा केली. यात समान पाणी पुरवठा योजना, नाले रुंदीकरण व खोलीकरण, डीपी रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्यांना टीडीआर व रोख मोबदला देण्याबाबतच्या मुद्यांचा समावेश होता.