जोपर्यंत जाती संपणार नाहीत, तोपर्यंत माणूस जोडला जाणार नाही – दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
संत रोहिदास महाराजांनी कधीही जातपात मानली नाही. जोपर्यंत जाती संपणार नाहीत, तोपर्यंत माणूस जोडला जाणार नाही. त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरांवर प्रहार केले. शोषित, पीडित, वंचित, दलित जनतेच्या आशाआकांक्षा आपल्या रचनांमधून मांडल्या. आजच्या काळात त्यांचे महान कार्य समजून घेऊन उपेक्षित असलेल्या समाजाचा अर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामाजिक संस्थांनी काम करणे गरजेचे आहे, असे मत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

संत रोहिदास महाराज चॅरिटेबल सोसायटी फलटणच्या वतीने फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी श्री कार्तिक स्वामी आश्रम, देवदरी अंभेरीचे संस्थापक अध्यक्ष प. पू. परशूराम महाराज वाघ यांच्या हस्ते आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका सौ. जयश्री कारंडे यांना संत रोहिदास महाराज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून दीपक चव्हाण बोलत होते.

यावेळी कोरेगाव कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण, व्यापारी रोहितशेठ शांतीकाका शहा, गणपतराव भोसले, संतोष सातपुते, ज्ञानेश्वर भगत, शशिकांत भोसले, पत्रकार अशोक सस्ते, युवराज पवार, यशवंत खलाटे पाटील, अध्यक्ष भोलेनाथ भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक विषमतेच्या काळात संतांनी भक्तीचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांनी जातपात मानली नाही. त्यामुळे संत महात्मे कोणा एका जातीचे नव्हते, तर सार्‍या विश्वाचे होते. आजच्या काळात हे संत महात्मे सार्‍या विश्वाचे होत नाहीत, तोपर्यंत आपली संस्कृती, परंपरा पर्यायाने देश टिकणे अशक्य आहे. संत रोहिदास महाराजांचे कार्य महान आहे. ते पुढच्या पिढीला कळणे महत्वाचे आहे. त्यासाठी अशा संतांची पुण्यतिथी ही ज्ञानयुक्त होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा परशूराम महाराज वाघ यांनी व्यक्त केली.

प्रारंभी महिलांचा हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली.

यावेळी संस्थेचे सचिव हृदयनाथ भोईटे, सहसचिव कृष्णात बोबडे, डॉ.साळे, अशोक भगत, नयना भगत, तुकाराम भोईटे, संतोष भोईटे, दीपक शिवदास, बंडू दोशी, समर्थ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, गणेश निकम, धनंजय धोंगडे यांसह समाजातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अरुण खरात यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल हंकारे यांनी सूत्रसंचालन केले. सागर भोईटे यांनी आभार मानले.

प. पू. परशूरामजी महाराज वाघ यांचा सत्कार करताना भोलेनाथ भोईटे, समवेत जयश्री कारंडे, रोहितशेठ शांतीकाका शहा, यशवंत खलाटे पाटील, युवराज पवार, अशोक सस्ते, संतोष चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!