कधी गारवा, तर कधी कडक ऊन! फलटणमध्ये लहरी हवामानामुळे नागरिक त्रस्त; वातावरणाचा अंदाज बांधणे कठीण


फलटण शहर व तालुक्यात काल झालेल्या पावसानंतर हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रात्रीचा उकाडा, सकाळचा सुखद गारवा आणि दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, वातावरणाचा नेमका अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : फलटण शहर व तालुक्यात काल (सोमवारी) अचानक झालेल्या पावसानंतर वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. या बदलत्या आणि लहरी हवामानामुळे नागरिक मात्र अस्वस्थ आणि त्रस्त झाले आहेत. एकाच दिवसात ऋतूंचे वेगवेगळे रंग अनुभवायला मिळत असल्याने वातावरणाचा नेमका अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे.

काल दुपारच्या सत्रात अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र, पाऊस पडून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा वाढल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उकाड्यामुळे रात्री अस्वस्थता जाणवत होती.

त्यानंतर आज (मंगळवारी) पहाटे आणि सकाळपासूनच वातावरणात पुन्हा एकदा सुखद गारवा पसरलेला पाहायला मिळाला. मात्र, हा गारवाही फार काळ टिकत नाही. दुपार होताच पुन्हा कडक ऊन आणि चटके देणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. दुपारच्या उन्हामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झालेली पाहायला मिळत आहे.

कधी अचानक ढगाळ वातावरण व पाऊस, रात्रीचा असह्य उकाडा, तर सकाळी पुन्हा गारवा आणि दुपारी कडक ऊन अशा या संमिश्र हवामानामुळे ‘नक्की वातावरण कसे राहील?’ हे आता कोणीच ठामपणे सांगू शकत नाही, अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, तापमानातील या अचानक होणाऱ्या चढउतारामुळे साथीच्या आजारांत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!