स्थैर्य, सातारा, दि. 5 : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून अनुभवाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे मानले जात आहे. मनोज शेंडे यांना आता हद्दवाढ घोषित झालेल्या भागावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
2016 साली झालेल्या सातारा नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ. माधवी कदम निवडून आल्या होत्या. खा. उदयनराजे यांनी प्रारंभी राजू भोसले, तद्नंतर सुहास राजेशिर्के, किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. उपनगराध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर खा. उदयनराजे यांच्या सूचनेनुसार किशोर शिंदे यांनी सौ. माधवी कदम यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे आणि श्रीकांत आंबेकर यांची नावे चर्चेत होती. प्रांताधिकारी मीनाज मुल्ला यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवड होणार असल्याचे घोषित केले होते त्यानुसार उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर खा. उदयनराजे व किशोर शिंदे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी अनेकांनी शेंडे यांचे अभिनंदन केले.
मनोज शेंडे यांच्या जबाबदारीत वाढ
मनोज शेंडे यांनी यापूर्वी सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापतिपदी काम केले आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाची त्यांना माहिती असल्यामुळे खा. उदयनराजे यांनी त्यांना उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिल्याचे मानण्यात येते. सातारची हद्दवाढ जाहीर झाली असून नगरपालिकेच्या निवडणुकीला केवळ एक वर्ष बाकी आहे. हद्दवाढीमध्ये 10 नवीन नगरसेवकांचा समावेश होणार असल्यामुळे मनोज शेंडे यांना हद्दवाढीमध्ये समावेश झालेल्या भागावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या भागात सातारा विकास आघाडीची कार्यकक्षा वाढवावी लागणार आहे.
सर्वांना बरोबर घेऊन काम करणार : मनोज शेंडे
यापूर्वी बांधकाम सभापतिपदी काम केल्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनातील आपल्याला माहिती आहे. नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व अधिकारी यांना सोबत घेऊन आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया मनोज शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.