स्थैर्य, सातारा दि. 20 : सातारा जिल्ह्यातील पाडळी (निनाम) या गावचे मूळ रहिवासी आणि ख्यातकीर्त आंतरराष्ट्रीय चित्रकार अशी ओळख अल्पावधीतच निर्माण करणार्या अमित ढाणे या युवा चित्रकाराने नुकतेच चिनी हल्ल्यात शहीद झालेले बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांचे अत्यंत सुंदर असे चित्र रेखाटून अनोखी मानवंदना दिली आहे. विशेष म्हणजे हे व्यक्तिचित्र संतोष बाबू ज्या सैनिक स्कूलमध्ये शिकले त्या शाळेला समारंभपूर्वक प्रदान करण्याचे नियोजन त्यांच्या वर्गमित्रांनी केले आहे. हे व्यक्तिचित्र भारतातील प्रत्येक सैनिक स्कूलमध्येही लावण्यात येणार आहे.
नुकतेच पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्काराच्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह त्यांचे सहकारी जवान पलानी, कुंदनकुमार ओझा व अन्य सहकारी शहीद झाले. युवा चित्रकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांची शंभरी पार करणार्या या चित्रकाराने संतोष बाबू या भारतमातेच्या सुपुत्राचे अत्यंत सुंदर असे चित्र रेखाटून आपल्या शैलीदार कलेच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. सध्या व्हॉटसअॅपच्या जमान्यात या चित्राची अनेकांनी प्रशंसाही केली आहे.
दरम्यान, हे चित्र संतोष बाबू यांच्या कोरुकोंडा येथील सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पाहिले आणि ते त्यांना इतके भावले, की त्यांनी अमित ढाणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून हे चित्र संतोष बाबू यांनी ज्या शाळेत सैनिकी शिक्षण घेतले त्या कोरुकोंडा येथील शाळेत लावण्यासाठी मागितले आहे. शाळेचे माजी विद्यार्थी हे व्यक्तिचित्र शाळेला समारंभपूर्वक प्रदान करणार आहेत. विशेष म्हणजे याच चित्राच्या प्रतिकृती संपूर्ण भारतात जेवढ्या सैनिक स्कूल आहेत त्या प्रत्येक शाळेत लावण्यात येणार आहेत. अमित ढाणे यांच्या या कलाकृतीचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. अमित ढाणे हे कलाशिक्षक चंद्रकांत ढाणे यांचे सुपुत्र आहेत.