मिरेवाडीच्या 82 वर्षीय आज्जीबाईंकडून फलटणच्या राजघराण्याप्रती अनोखी कृतज्ञता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२५: मिरेवाडी (ता.फलटण) येथील 82 वर्षीय आज्जीबाईंनी पायपीट करत, हातात भुईमुगाच्या शेंगानी भरलेलं ठीक घेऊन थेट फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे फलटणमधील ‘जय व्हीला’ हे निवासस्थान गाठले. श्रीमंत रघुनाथराजेंना त्या शेंगा स्वत:च्या हातांनी सुपूर्द केल्या आणि ‘‘तुमच्यामुळं आमची शेती फुललीय; त्याचा मोबदला देता येत न्हाई. पण, फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे शेंगाच ठीक आणलंय’’, असे म्हणत फलटणच्या राजघराण्याप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली. अचानक घडलेला हा भावूक क्षण अनुभवल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजेंसह तेथे उपस्थित सर्वच कार्यकर्ते गहिवरुन गेले.

या क्षणाचे साक्षीदार ठरलेले फलटणमधील युवा कार्यकर्ते प्रीत खानविलकर यांनी सांगितले की, मिरेवाडीतून 82 वर्षांच्या आज्जी हातात कशाचं तरी ठीक घेऊन फलटणला चालत आल्या. फलटणला इतर कोठेही न जाता त्यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे जय व्हीला निवासस्थान गाठले. श्रीमंत रघुनाथराजे यांनी देखील त्या 82 वर्षीय आज्जींचा सन्मान राखत त्यांचा पाहुणचार केला.

तद्नंतर श्रीमंत रघुनाथराजे यांनी, ‘‘काय आज्जी, का आलात?’’ असे विचारले असता, त्या आज्जींनी काही न बोलता हातात असलेलं पोत समोर ठेवलं आणि म्हणाल्या, ‘‘ही द्यायला.’’ यावर श्रीमंत रघुनाथराजे यांनी त्यांना विचारले, ‘‘काय आहे त्यात?’’ आज्जींनी कसलाही वेळ न लावता उत्तर दिलं, ‘‘ह्या आमच्या रानातल्या भुईमुगाच्या शेंगा हायत. आज तुमच्यामुळं आमची शेती फुलतीय. त्याचा मोबदला देता येत न्हाई. पण, फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे शेंगाच ठीक आणलंय.’’

‘‘इतका लळा आणि इतकी आपुलकी फलटण तालुक्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नाईक-निंबाळकर राजघराण्यालाच मिळाली असेल. खरंच तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हवेहवेसे वाटणारे हे नाईक-निंबाळकर राजघराणे हेच जनतेचे तारणहार आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे’’, अशी भावना प्रीत खानविलकर यांनी यानंतर व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!