दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला जम्मू-काश्मीरमध्ये अपघात झाला आहे. रिजिजू हे प्रवास करत असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने रिजिजू या अपघातातून बालंबाल बचावले असून, या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच रिजिजूसुद्धा पूर्णपणे ठीक आहेत.
रिजिजू आज जम्मू-काश्मीरमध्ये दौऱ्यावर होते. तिथे रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने केंद्रीय कायदेमंत्र्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रिजिजू यांना अपघातग्रस्त कारमधून उतरवून दुसऱ्या कारमध्ये बसवले.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री आपघातग्रस्त कार आणि टक्कर मारणार ट्रक दिसत आहे. तसेच सुरक्षा कर्मचारी किरेन रिजिजू यांच्या गाडीजवळ पळत येताना दिसत आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर आणून दुसऱ्या कारकडे नेतानाही दिसत आहेत.