महाबळेश्वर येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा केंद्रीय अन्न नागरी पुरवठा सचिव सुधांशु पांडे यांच्या हस्ते शुभारंभ


दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । सामान्य नागरिकांच्या तक्रारी,अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा,याउद्देशाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ची विशेष मोहीम शासनाच्यावतीने सुरु करण्यात आली असून महाबळेश्वर येथे या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय अन्ननागरी पुरवठा विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना विविध दाखले वाटप करून करण्यात आले.

यावेळी  उपायुक्त (पुरवठा) पुणे विभाग डॉ त्रिगुण कुलकर्णी,जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते व तहसीलदार सुषमा चौधरी पाटील ,भारतीय खाद्य निगमच्या विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना आदी उपस्थित होते.

केंद्रीय अन्ननागरी पुरवठा विभागाचे  सचिव सुधांशु पांडे हे दोन दिवसाच्या महाबळेश्वर दौऱ्यावर असून त्यांनी तालुक्यातील आयएसओ प्रमाणित रेशन दुकाने तसेच गोडाऊन आदींची पाहणी केली मेटगुताड येथील सुनील बावळेकर यांच्या स्वस्त धान्य दुकानाची पाहणी करून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप सुधांशु पांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. पांडे यांनी  महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम,डोंगरी भागाची माहिती देताना पावसाळा,अतिवृष्टीमध्ये अन्नधान्य पोचविण्यासाठी येणाऱ्या अडचणीची माहिती दिली.

शासनाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ची विशेष मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय अन्ननागरी पुरवठा विभागाचे  सचिव सुधांशु पांडे यांच्या हस्ते महसूल विभागांतर्गत नवीन शिधा पत्रिका, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, नॉनक्रिमिलेअर दाखले यांचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

यावेळी सुधांशु पांडे म्हणाले ,सेवा पंढरवाड्यानिमित्त शासनाच्या विविध विभागांकडे नागरिकांचे प्रलंबित असलेले सर्व अर्ज व तक्रारी या सेवा पंढरवाड्या दरम्यान निकाली काढण्यात येणार आहेत यामध्ये पालिका,जिल्ह्यातील सर्व कार्यालयांचा समावेश असून देशात ही मोहीम सुरु करण्यात आली असून सर्वच विभागामध्ये हे अभियान चालविण्यात येत आहे मला महाबळेश्वरमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्याचा विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले .

याप्रसंगी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील पार्टे,पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे,महावितरणचे चेन्ना रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सचिन धोत्रे,अजय तोडकर, लक्ष्मण हिरवे,मंडलाधिकारी के एम खटावकर महसूल सहाय्यक कौस्तुभ भोकरे ,पुरवठा निरीक्षक राजश्री गोसावी ,अव्वल कारकून प्रकाश नाळे, लक्ष्मण ईड्लीवर, तुषार निकम आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!