दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | फलटण शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप रंगत आहेत. या वादंगात सदर योजनेच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर फिरत असलेला लेख वाचकांसाठी देत आहोत…..
सध्या शहरात एकच विषय चालू आहे तो म्हणजे भुयारी गटार योजना. सगळ्यात जास्त ओरड होते आहे ती रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच रस्ते खांदल्यामुळे लोकांना होणार त्रास असेल; काही अंशी हि तक्रार योग्यही आहे परंतु भुयारी गटार योजना अशीच मार्गी लागते. आपण सहज गुगलला चेक करून पहा जिथे जिथे भुयारी गटार योजनेचे काम चालू असते तिथं हीच परिस्थिती असते किंबहुना त्याहूनही वाईट परिस्थिती असते. तरी फलटण शहरातील परिस्थिती इतर शहराच्या दृष्टीने खूप चांगली आहे. इतर ठिकाणी सुमारे चार ते सहा वर्षे भुयारी गटार योजना मार्गी लागण्यास लागतात.
भुयारी गटार योजनेमुळे आरोग्याचे बरेच प्रश्न सुटणार आहेत. त्यामध्ये डेंगू, मलेरिया, चिकनगुणिया यासारखे डासांमुळे होणारे आजार तसेच सांडपाण्यामुळे होणारे इतर आजार, साथीचे आजार हे बरेचसे कमी होणार आहेत. तसेच गटारातील विषारी वायूचे परिणाम मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत ते देखील कमी होईल.
विरोधी पक्ष भुयारी गटार योजनेवर टीका करतोय परंतु ही भुयारी गटार योजना नक्की काय आहे त्याचे फायदे काय आहेत? हे देखील पहाणे महत्वाचे आहे –
फलटण शहरातील सांडपाणी बंद भूमिगत वाहिनीद्वारे (पाईपलाईनद्वारे) STP मध्ये प्रक्रिया करून त्या पाण्याचा शेतीसाठी उद्योगासाठी वापर करण्यासाठी हा प्रकल्प आहे.
सांडपाणी म्हणजे फलटण शहरातील प्रत्येक घरगुती बाथरूम व संडास व इतर सार्वजनिक शौचालये यांचा उत्सर्ग होय.
हा प्रकल्प पुढचे तीस ते चाळीस वर्षे समोर ठेवून नियोजित केला आहे.
फलटण शहरातील बारा झोन मध्ये ही योजना विभागली असून दोन STP (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) कार्यान्वित होणार आहेत. याची क्षमता सुमारे २.५ MLD आणि ५.५ MLD आहे. या प्रकल्पात सर्व पाईपलाईन भूमिगत असून जागोजागी चेंबरचे नियोजन केले आहे. पाईपलाईन ही hdpe DWC (Double Wall Corrugated) प्रकारची आहे. सध्या जगात वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक प्रकारची पाईप आहे. भुयारी गटार योजना म्हणजे फक्त आपल्याला दिसत असलेली पाईपलाईन नसून त्यामध्ये दोन STP (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) दोन पंपिंग स्टेशन, सक्शन पंप त्यांना विद्युतपुरवठा करण्यासाठी दोन डीजी सेट जनरेटर, दोन एक्सप्रेस फिडर आहेत. जागोजागी चेंबर स्वच्छ करण्यासाठी सक्शन कम जेटींग मशिन व मोबाईल फ्लश टॅक आहेत. तर ही झाली भुयारी गटार योजनेची तांत्रिक माहिती.
भुयारी गटार योजनेला विलंब का होतो? त्याची काही कारणे असतात –
सांडपाण्यात मैला व इतर घन पदार्थ असतात. या पदार्थांचा पाण्याच्या प्रवाहाद्वारे विशेष निचरा होणे आवश्यक असते. याकरिता प्रवाहाला काही विशिष्ट वेग असावा लागतो. जर हा प्रवाह बऱ्याच अधिक वेगाने वाहील, तर एकाच चेंबरमध्ये जास्त सांडपाणी साठून राहते व प्रवाहास त्यामुळे अडथळा होतो व पाईपलाईनची मजबुतीही कमी होते. पाईपलाईनमध्ये विविध ठिकाणांहून येणारा प्रवाह हा गुरुत्वाकर्षणी असल्याने त्या नेहमी उतरत्या ढाळात बसवितात. त्यामुळे सतत खाणकाम व पाईपलाईनची एडजस्टमेंट करावी लागते. जमिनीचे नैसर्गिक उतार शोधावे लागतात. फक्त वरवरचं काम केले तर भुयारी गटार योजना ठप्प होते.
पाईपलाईनमध्ये निर्माण होणारे वायू हे विषारी असतात तसेच वजनाने हलके असल्याने ते उताराच्या विरुद्ध दिशेने वर सरकतात. ते वायू वातावरणात विशिष्ट उंचीवर सोडण्यासाठी व वाहिनीचे वायुवीजन करण्यासाठी चेंबर मध्ये विशिष्ट दाब नियंत्रीत ठेवावा लागतो. त्यासाठी पाईपलाईनची जागा सतत उताराच्या दिशेने बदलत राहावी लागते.
भुयारी गटार योजना राज्य शासनाकडे मंजूर करण्यासाठी काही अटी असतात त्याची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामध्ये मालमत्ता कराचे पुर्नमुल्यांकन करणे, नगरपालिका कामकाजाचे आधुनिकीकरण, मालमत्ता कर व पाणीपट्टी ८०% वसुली, गरीबांसाठी वेगळा निधी, जल लेखापरिक्षण (वाॅटर ऑडीट) अशा वेगवेगळ्या अटींची पूर्तता करावी लागते. पर्यावरण विभागाच्या व पुरातत्व विभागाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तरच राज्य सरकारचे अनुदान मंजुर होत असते यासाठी शासन दरबारी पाठपुरावा आवश्यक असतो.
सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे निधीची कमतरता. राज्यात मंजुर असलेल्या अनेक भुयारी गटार योजना या निधी अभावी रखडलेल्या अवस्थेत आहेत. भुयारी गटार योजना राबवताना जे सर्वेक्षण करतात तेव्हा अंदाजीत केलेला निधी आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर येणारा अडचणी यातून हा निधी कमी पडू लागतो.
सुदैवाने फलटण शहराचे नेतृत्व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असल्याने फलटण शहरातील कोणताही प्रकल्प निधीअभावी रखडलेला नाही. भुयारी गटार योजनेसाठी सुरवातीला ७५ कोटी खर्च अंदाजीत होता परंतु प्रकल्पाचे स्वरूप लक्षात घेता खर्चामध्ये वाढ झाली व हा खर्च ११८ कोटींवर गेला. सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना असेल वैशिष्ट्यपूर्ण योजना, पाणीपुरवठ्याच्या इतर योजना असतील अश्या अनेक योजना शासन दरबारी पाठपुरावा करून फलटण शहराला आधुनिक तंत्रज्ञान युक्त शहर बनविण्याकडे वाटचाल सुरू आहे.
आपण आपले घर बांधताना किंवा त्यात सुधारणा करताना जसे थोडे दिवस गैरसोयीचे काढतो अगदी तसाच त्रास फलटण शहरातील नागरिकांनी आपले शहर आधुनिक करताना सहन केला आहे त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत.