दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । मॅग्नेट प्रकल्पांतर्गत या पुढील टप्प्यामध्ये प्रकल्पात सहभागी होवू इच्छित असलेल्या एफ.पी.ओ. समवेत समन्वय साधणे, मुल्यसाखळीची क्षमता वाढविणे, त्यांना प्रकल्प अहवालामध्ये मार्गदर्शन करणे व प्रशिक्षणदेणे इ. समन्वय साधण्यासाठी“ ॲकर एफ. पी. ओ. ” ची निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी या पिकामध्ये काम करीत असलेली श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, भिलार, ता. महाबळेश्वर या संस्थेची ॲकर एफ.पी.ओ. म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
नुकताच मॅग्नेट प्रकल्प व श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था, भिलार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. हा सामंजस्य करारावर श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था, भिलार यांच्यावतीने गणपत रामचंद्र पारटे यांनी व मॅग्नेट सोसायटीच्या वतीने प्रकल्प उपसंचालक, डॉ.सुभाष घुले यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ॲकर एफ.पी.ओ. सामंजस्य करारामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना मॅग्नेट प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी व शेत मालाचे काढणी पश्चात होणारे नुकसान कमी करण्यास चालना मिळणार असून विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतमालाच्या विपणनास प्रोत्साहन मिळणार आहे.
राज्यातील फलोत्पादानाचे मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने आशियाई विकास बँक सहाय्यीत मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. फलोत्पादनामध्ये डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिक्कु, भेंडी, मिरची (लाल व हिरवी) आणि फुलेया अकरा पिकांचा मॅग्नेट प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातून 124 शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व 45 मुल्य साखळी गुंतवणुकदारांचा समावेश होता. राज्यातून एकुण 169 प्रस्ताव प्रकल्पांतर्गत सादर करण्यात आलेले होते. पणन संचालक सुनिल पवार व प्रकल्प संचालक दिपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅग्नेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 30 शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, मुल्यसाखळी, गुंतवणुकदारांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यातआलेली आहे.
यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रियादार, संघटीत किरकोळ विक्रेते, कृषि व्यवसाय करणारे लघु व मध्यम उद्योजक वित्तियसंस्था, स्वयंसहाय्यता समुह यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प एक हजार कोटींचा (साधारणत: 142.9 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा) असून या प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षाचा म्हणजे सन 2026-27 पर्यंत प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
प्रकल्पामध्ये निवडण्यात आलेल्या पिकांसाठी शेतकरी उत्पादक संस्थांचा क्षमता विकास करणेकरीता शेतकऱ्यांना उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक पिकपध्दतीचा वापर, काढणी पश्चात हाताळणी, निर्यात व देशांतर्गत बाजार पेठेनुसार गुणवत्ताची पुर्तता करणे इ. विषयक प्रशिक्षणदेणे इ. कामकाज करण्यात येणार आहे.
प्रकल्पात काढणी पश्चात सुविधासाठी अर्थ सहाय्य करणेकरीता मुल्यसाखळीतील आंतर्भुत घटकांचा (शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रियादार इ.) काढणी पश्चात पायाभुत सुविधा उभारणीसाठी तसेच शेतकरी उत्पादक संस्थांना शेतालगत माल एकत्रित करणे, त्याची स्वच्छता, प्रतवारी व पॅकिंग करणे इ.साठी प्राथमिक सुविधा उभारणीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. लघु व मध्यम प्रक्रिया उद्योजक निर्यातदार व प्रक्रियादारांना सुध्दा मुल्यसाखळ्याअंतर्गत पायाभुत सुविधा उभारणीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. घटकांना खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्ज हे सुध्दा अल्प व्याजदरात उपलब्ध केले जाणार आहे.
प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी कृषि विषयक काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन, मुल्यवृध्दी, प्राथमिक/ दुय्यम प्रक्रिया, विपणन आदी विविध बाबींशी निगडित शेतकरी उत्पादक संस्था व मुल्यसाखळी गुंतवणुकदार या लाभार्थ्यांच्या उपप्रकल्पांना जास्तीत जास्त 60 टक्क्यापर्यंत अर्थ सहाय्य देय राहणार आहे. तसेच इच्छुक उपप्रकल्पांना Financial Intermediation Lone (FIL.) या उपघटकांतर्गत भागीदारी वित्तीय संस्थाद्वारे खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यातून प्रकल्पांतर्गत उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवणे सोपे होईल.