दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांच्या आत आहे, त्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाचे भाडे आता आगाऊ (ॲडव्हान्स) देण्यात येणार आहे. या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झाल्यानंतर पूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विमानाचे तिकीट काढून त्या देशात जावे लागत असे. विद्यापीठात प्रत्यक्ष हजार झाल्यानंतर त्यांनी विमानाचे तिकीट व बोर्डिंग पास जमा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यास विमानाचे भाडे दिले जायचे. यामुळे ऐनवेळी तिकिटासाठी लागणारी रक्कम जुळवताना गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असे.
याचाच विचार करून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक 6 लाखांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना विमान प्रवासासाठी आवश्यक पैसे वेळेत जमवणे शक्य होत नसे. त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यासाठी आवश्यक पैसे आगाऊ देण्याची गरज होती त्यासाठी नियमावलीत बदल केला असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक आहे त्या विद्यार्थ्याना मिळणारा विमान प्रवास खर्चाचा लाभ पूर्व नियमानुसार सुरूच राहणार आहे.