कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचे मनोधैर्य खचू देणार नाही : ना. शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. २१  : पोलिस दल, प्रशासन आपले काम चोख बजावत आहेत. विशेषत: पोलिसांचा जनतेशी सर्वाधिक संपर्क येत असून प्रसंगी धोका पत्करुन ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचे मनोधैर्य खचू देणार नाही. जेथे जेथे जे जे करणे आवश्यक आहे ते ते करण्याबाबत तातडीने निर्णय घेतले जात असून सर्व खात्यांच्या समन्वयातून परिस्थिती नक्की आटोक्यात आणली जाईल, असा विश्‍वास राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी वाई येथे व्यक्त केला.

कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी वाई शहरात येवून आ. मकरंद पाटील यांना सोबत घेवून सर्व परिस्थितीची स्वत: ठिकठिकाणी जावून पाहणी केली. अनेक प्रश्‍नांबाबत जाग्यावरच आदेश देत कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संंबंधितांना दिल्या तर काही प्रश्‍नांबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. या दौर्‍यात त्यांनी प्रशासनासह विशेषत: पोलिसांच्या कामगिरीची वाखाणणी करत यंत्रणेचे मनोधैर्य खचू देणार नाही, अशी ग्वाही दिल्याने सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांचे मनोबल वाढले.

वाई येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे वेळोवेळी सर्व मंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोनाशी सुरु असणार्‍या लढाईत त्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरत आहे. लॉकडाउनमुळे कोरोनाला आळा घालणे शक्य होत आहे. पुढील काळात निर्णय काय घ्यायचे याबाबत स्वत: सर्वत्र फिरुन, चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेत आहे. पोलिस दलावर या सर्व परिस्थितीत मोठी जबाबदारी येवून पडली आहे. बंदोबस्त व विविध निर्णयाच्या अंमलबजावणी करताना जनतेशी सर्वाधिक संपर्क हा पोलिसांचा येत आहे. त्यामुळे पोलिसही कोरोना बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांना फेस शिल्ड, सॅनिटायझर सोबत इतर सुविधा देताना 55 वयापुढील पोलिस कर्मचार्‍यांना रस्त्यावरील बंदोबस्तातून वगळले आहे. पोलिस दलावर प्रचंड ताण आहे. याची जाणीव आहे. मार्त्रें तरी देखील जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. अपवादात्मक परिस्थितीत कोठे काही झाले तर त्वरीत दखल घेतली आहे.

नगरपालिकांकडील राखीव निधीखर्चाबाबत मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्याने आ. मकरंद पाटील यांनी आपणास सांगितले असून त्याबाबत नगर विकास मंत्र्यांशी आजच बोलणार आहे, असे स्पष्ट करुन ना. देसाई म्हणाले, विशेषत:  वाई विधानसभा मतदारसंघात आ. मकरंद पाटील व प्रशासनाचा उत्तम समन्वय आहे ही समाधानाची गोष्ट आहे. काही ठिकाणी त्रूटी असल्यास त्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश आपण दिले आहेत. जुगारप्रकरणी केलेली कारवाई ही पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी असून यातील आरोपी वाई तालुक्यात आले कसे? याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. धान्य वाटप योेजनेचे काम देखील समाधानकारक आहे. या कामात संबंधित अधिकारी कर्मचारी विशेष तत्परता दाखवत आहेत. जेथे कुठे अडचणी असतील त्यावर समन्वयाने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सांगून पोलिसदलाच्या सहकार्यासाठी जिल्ह्यात 300 होमगार्ड तैनात केल्याचे सांगितले.

सर्व प्रमुख अधिकार्‍यांची उपस्थिती

गृहराज्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगिता चौगुले राजापुरकर, तहसिलदार रणजित भोसले, पं. स. चे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, पोलिस उपाधिक्षक अजित टिके, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, पोलिस निरीक्षक आनंदा खोबरे, सपोनि श्याम बुवा, शिवेसेनेचे जिल्हा प्रमुखचंद्रकांत जाधव, पं. स. चे उपसभापती विक्रांत डोंगरे, शिवसेनेेचे शहरप्रमुख किरण खामकर, अनिल शेंडे, विवेक भोसले यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मोठा पोलिस फौजफाटा उपस्थितहोता.

कणखरगृहमंत्री

कोरोनाशी मुकाबला करताना प्रशासन, पोलिस दल जसे काम करत आहे तसेच जनताही आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशा परिस्थितीत कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये. परिस्थितीचे गांभिर्य सर्वांच्याच लक्षात आले आहे आणि येत आहे. असे असताना जाणीवपूर्वक कोणी अडथळे निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी देत आपल्यातील कणखरपणाची प्रचिती दिली.

थेट मला फोन कराबेकायदादारु विक्रीप्रकरणी पुरेशा ताकदीने कारवाया होत नाहीत या प्रश्‍नावर बोलतानाना. शंभूराज देसाई म्हणाले, राज्य उत्पादनशुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मी स्वत: उद्याच संबंधित अधिकार्‍यांना बोलावून कठोर कारवाया करण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले. तसेच ज्याकोठे बेकायदा दारु विक्री अथवा बेकायदा धंदे सुरू असतील त्या बाबत थेट मला कळवा. अशा बेकायदा कृत्यांना कधीच पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

शिवसैनिकाला त्रास होता कामा नये

यावेळी गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भेटीसाठी आलेल्या सर्व शिवसैनिकांशी जिव्हाळ्याने संवाद साधला. त्यांना पुरेसा वेळ देत त्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांची तड लावण्याची ग्वाही दिली. कोणाही शिवसैनिकाला त्रास होता कामा नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसैनिकांना सामावून घ्या, अन्यथा मला लक्ष घालावे लागेल असेही आ. मकरंद पाटील यांना सांगितले. त्यावर आ. पाटील यांनी त्यांनाच विचारा असे सांगताच इथं सर्व ठिक आहे असे उत्तर येताच एकच हशा पिकला. या सर्व धावपळीतआपल्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही आवर्जून वेळ देत त्यांचा सन्मान राखत ना. देसाई यांनी कणखरपणा सोबत कनवाळू नेतृत्वाचे दर्शन घडविले, अशी चर्चा संबंधितांमध्ये होत होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!