दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर देगावच्या माळावर प्रथमच बैलगाडा शर्यतींचा थरार जोरकसपणे रंगला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये हातात कासरा डोक्यात मुंडासं अशा खास पेहरावात उदयनराजे यांची बैलगाडीतून एन्ट्री झाल्यानंतर देगावच्या माळावर एकच जल्लोष झाला या स्पर्धेसाठी सुमारे दहा हजाराहून अधिक लोक जमा झाले होते.
साताऱ्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात बेधडक वक्तव्य आणि आपल्या हटके स्टाईल साठी खासदार उदयनराजे भोसले प्रसिद्ध आहेत. येत्या चोवीस फेब्रुवारी निमित्त देगावच्या माळावर उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खास बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. सुमारे 50 हून अधिक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत भाग घेतला. देगावच्या संपूर्ण पंचक्रोशीत या स्पर्धेनिमित्त प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी आठ वाजल्यापासूनच बैलगाडी धावेच्या दुतर्फा शौकिनांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या हलगी. कडाडली कि बेफामपणे धावणाऱ्या बैलगाड्या आणि जोरदार शिट्ट्या हवेत उडणारी उपरणी यामुळे दहा वर्षांपूर्वीचा ग्रामीण बाजाचा माहोल पुन्हा एकदा जिवंत झाला. हा सर्व थरार देगावचा माळ पहिल्यांदाच पुन्हा अनुभवत होता.
दुपारी एक च्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांचे हातात कासरा डोक्याला मुंडासं अशा खास पेहरावात बैलगाडीतून आगमन झाले. या आगमनानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष निर्माण झाला आणि हलगी चा नाद जोरात घुमला. देगावच्या संपूर्ण माळाला उदयनराजे यांनी बैलगाडीतून एक फेरी मारली. हलगीच्या निनादात ते स्टेजवर दाखल झाले. तत्पूर्वी बैलगाडीत बसून उदयनराजे यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली तेव्हा युवा वर्ग मध्ये पुन्हा एकदा जल्लोष निर्माण झाला. वाघ हाय वाघ हाय असे म्हणत त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. या स्पर्धेसाठी झालेल्या गर्दी वरून उदयनराजे हे काय रसायन आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कोरोना चा संसर्ग खूपच कमी झाल्यानंतर प्रथमच शिवजयंती आणि सार्वजनिक कार्यक्रमात वरील बंधने राज्य शासनाने शिथिल केली आहेत त्यामुळे या स्पर्धेसाठी संपूर्ण तरुणाईचा जल्लोष आणि बैलगाडा स्पर्धांचा थरार देगावच्या माळावर पाहायला मिळाला या स्पर्धेचे आकर्षण बिंदू ठरले ते खासदार उदयनराजे भोसले या स्पर्धेसाठी तब्बल दोन तास उदयनराजे यांनी वेळ दिला आणि बैलगाडा शर्यती चा स्वतःचा आनंद लुटला शेंद्रे येथील संजय पोटेकर यांच्या बैलगाडीने 111111 रुपयांचे पहिले बक्षीस प्राप्त केले .