स्थैर्य,अमेरिका,दि.१९: अमेरिकेतील जो बिडेन प्रशासनाने संसदेत महत्वाकांक्षी इमिग्रेशन विधेयक आणले आहे. या बिलामुळे लाखो भारतीय आयटी व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी देशातील स्थलांतरितांची संख्या मर्यादित करण्यासाठी पूर्वीचे निर्बंध हटविण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. ‘अमेरिका नागरिकत्व विधेयक 2021’ कायदा बनल्यानंतर एच -1 बी व्हिसाधारकांनाही काम करण्याची परवानगी दिली जाईल. अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो भारतीयांनाही याचा फायदा होणार आहे. संसदेचे दोन्ही सभागृह प्रतिनिधी सभा आणि सीनेटमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सहीनंतर कायदा लागू होईल. त्यानंतर कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि कायदेशीररित्या देशात राहणाऱ्या लाखो लोकांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
भारतीयांना याचा सर्वाधिक फायदा
या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोट्यवधी भारतीय आयटी व्यावसायिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याचा फायदा होईल. हे विधेयक मंजूर झाल्यावर ज्या लोकांना 10 वर्षांहून अधिक काळ ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना व्हिसाच्या अटीवर सूट देत त्वरित कायदेशीर मार्गाने देशात कायदेशीरपणे राहण्याची परवानगी दिली जाईल. या विधेयकाचा मसुदा तयार करणारे सिनेटचा सदस्य बॉब मेनेंडेझ आणि प्रतिनिधीमंडळाचे सदस्य लिंडा सान्चेझ यांनी सांगितले की, अमेरिका नागरिकत्व विधेयक 2021 मध्ये इमिग्रेशन सुधारणांची तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाअंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणाऱ्या व्यावसायिकांना कायमस्वरुपी राहण्यासाठी कायदेशीर मान्यता देखील दिली जाईल. या कायद्याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ
बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर हे विधेयक संसदेत पाठविले. याअंतर्गत प्रलंबित रोजगार आधारीत व्हिसा मंजूर केले जातील. प्रत्येक देशासाठी व्हिसावर लागू केलेली मर्यादा देखील दूर केली जाईल आणि प्रतीक्षेचा कालावधी कमी होईल. अमेरिकन विद्यापीठातील एसटीईएम विषयातील पदवीधारकांना अमेरिकेत राहणे आता सुलभ झाले आहे. उल्लेखनीय आहे की, अमेरिकन विद्यापीठांमध्ये एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) विषयातील पदवी मिळविणारे सर्वाधिक विद्यार्थी भारतीय आहेत.
10 रिपब्लिकन सदस्यांचा पाठिंबा आवश्यक
दोन्ही सभागृहात सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. तथापि, सभागृहात हे विधेयक संमत होण्यासाठी पक्षाला 10 रिपब्लिकन सदस्यांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. डेमोक्रेटिक पार्टी आणि व्हाईट हाऊसच्या नेतृत्वाने अशी आशा व्यक्त केली आहे की, अमेरिकेत राहणाऱ्या लाखो गैर-नागरिकांच्या हितासाठी आवश्यक सहकार्य मिळेल.