स्थैर्य, वाई, दि. १६: खावली (ता वाई) या गावातील महिलांनी आम्हाला व आमच्या कुटुंबीयांस वाळीत टाकल्याची तक्रार दोन महिलांनी तहसीलदारांकडे आज केली.
सरुबाई नामदेव शेलार व शकुंतला राजेश शेलार अशी तक्रारदार महिलांची नावे आहेत. तहसीलदाराकडे केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गावातील लग्नसोहळे, महिलांचे कार्यक्रम व शेतीच्या कामांसाठी आम्हाला बोलावले जात नाही. गावातील ९० कुटुंबांपैकी आमच्या दोन कुटूंबियानाच गावातील कार्यक्रमाचे निमंत्रण जाणीव पूर्वक दिले जात नाही. गावातील महिला दिनानिमित्त आयोजित नवलाई मंदिरात दहा ते बारा महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आम्हा दोघींना निमंत्रण दिले नव्हते.सर्व कार्यक्रमास गाव व गावातील महिला एकत्र येतात. परंतु आम्हाला एकत्र येऊ दिले जात नाही. काही कार्यक्रमाचे बैठकीचे निमंत्रण आमच्या कुटुंबियांना दिले जात नाही. त्यामुळे आम्हाला व आमच्या कुटुंबियांना खूपच मानसिक धक्का बसला आहे. गावातील लोक आम्हाला अपमानीत करत असल्याची भावना मनात उत्पन्न झाली असल्याची तक्रार वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याकडे केली आहे. याबाबत कोणतेही राजकीय कारण व वाद नाही. मात्र गावातील लोक परस्पर समजुतीने आम्हाला वेगळे टाकतात असल्याचे सरुबाई नामदेव शेलार यांनी येथे पत्रकारांना सांगितले.