दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । सदरबझार मधील सैनिक नगरातील बंद घर फोडत चोरट्यांनी घरात असणाऱ्या चावीच्या मदतीने बंगल्याच्या आवारात असणारी २० हजार रुपयांची दुचाकी चोरुन नेली. बंगल्याच्या आवारातील दुचाकी चोरत असतानाच त्याठिकाणी दुसरी दुचाकी चोरट्यांनी ठेवत पळ काढला. याची तक्रार शुक्राचार्य विष्णू साळुंखे (रा. सैनिक नगर) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
सदरबझार मधील सैनिक नगरमध्ये शुक्राचार्य साळुंखे हे राहण्यास आहेत. कामानिमित्त साळुंखे हे ता. ३ रोजी बाहेर गेले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी साळुंखे यांच्या बंगल्याच्या दाराचे कुलुप तोडत आत प्रवेश केला. आतमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकत चोरट्यांनी किंमती वस्तुंचा शोध घेतला, मात्र त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. चोरट्यांनी यानंतर बंगल्यात असणाऱ्या चावी घेत आवारात असणारी २० हजारांची दुचाकी चोरली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी बंगल्याची पाहणी केली. चोरट्यांनी साळुंखे दुचाकी चोरुन नेत त्या जागी दुसरीच दुचाकी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. याचा तपास हवालदार भोसले हे करीत आहेत.