स्थैर्य, सातारा, दि.15 : पाटखळ माथा, ता. सातारा येथे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला. वसंत परबती सोनमळे असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आनंदराव बबनराव धुमाळ या चारचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, अभिजित नंदकुमार सोनमळे (वय 28, रा. लिंंब, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. 12 मार्च रोजी त्यांचे चुलते वसंत परबती सोनमळे हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 11 – सीएल 1823) निघाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते पाटखळ माथा येथील कदम पेट्रोल पंपासमोर लोणंद – सातारा रस्त्यावर आले असताना समोरुन आनंदराव बबनराव धुमाळ (रा. गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा) हा चारचाकीने (एमएच 04 – सीबी 8336) वेगाने आला होता. निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाने वेगाने चारचाकी घेवून आलेल्या आनंदराव याने वसंत सोनमळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अभिजित सोनमळे यांनी शनिवार, दि. 13 मार्च रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आनंदराव धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे करत आहेत.