
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । पुसेगाव खटाव राज्य महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील पुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलँड मशीनला दुचाकीची धडक बसून खटाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ चव्हाण वय २९ असे मृत तरुणाचे नाव आहे तर कपिल राजेंद्र गुंजवटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवार दिनांक 20 रोजी रात्री उशिरा हा अपघात घडल्याची माहिती आहे याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. पुसेगाव खटाव रस्त्यावर पुलाची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी माती मुरूम रस्त्यावर पडल्याने आणि रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी काम चालू असतानाही सूचना फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची तक्रार होत आहे.