दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । वाई । वाई शहरातील सिद्धनाथवाडी येथे संशयास्पदरित्या मोपेडवरुन फिरताना प्रतिक लक्ष्मण भोसले (वय 19 वर्षे, रा.शिरगांव ता.वाई), हेमंत किशोर कदम (वय 19 वर्षे रा. खेड (नांदगीरी) ता. कोरेगाव) हे दोघे वाई पोलिसांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. महाबळेश्वर आणि वाई येथून चोरी झालेल्या सहा दुचाकी असा सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक उमेश गहीण, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, हेमंत शिंदे, अक्षय नेवसे हे शोध घेत असताना त्यांना सिद्धनाथवाडी येथे काळय़ा रंगाची मोपेड सिद्धनाथवाडी येथे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. या मोपेडवरील प्रतिक भोसले, हेमंत कदम यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पोलिसांना दुचाकी चोर असल्याचे समजले. त्यांनी गेल्या एक महिन्याच्या कालावधीत महाबळेश्वर येथून 1 बुलेट व 1 हिरो होंन्डा स्प्लेंन्डर दुचाकी तसेच वाई शहरातून 4 हिरो होंन्डा स्प्लेंन्डर दुचाकी अशा सुमारे 3 लाख रुपयांच्या 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी त्या दुचाकीपैकी काही दुचाकी दडवून ठेवलेल्या होत्या व काही दुचाकी आई, आज्जी आजारी असल्याने पैशाची गरज आहे असे कारण सांगून विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर त्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. याबाबत वाई पोलीस स्टेशन व महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद आहेत. या गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सोनाली माने या करीत आहेत.