सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; शाहूपुरी पोलिसांची कारवाई
स्थैर्य, सातारा, दि. 5 : येथील तांदूळआळी येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा) अल्टो कारमधून घेऊन जात असताना शाहूपुरी पोलिसांनी कारवर छापा टाकून कारसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोघांवर रात्री उशिरापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. नौशाद इमामुद्दिन मोदी आणि सद्दाम नौशाद मोदी, दोन्ही रा. 478, शनिवार पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अवैध गुटखा विक्री करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन त्यांना मार्गदर्शन केले होते. शुक्रवार दि.5 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली, की सातारा येथील तांदूळआळी ते देवी चौक दरम्यान अल्टो कार क्रमांक (एम. एच.11 एके 1304) मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा सदृश माल दोन इसम बेकायदेशीर वाहतूक करणार आहेत. मिळालेल्या या माहितीवरून त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांदूळ आळी येथे सापळा लावून संबंधित अल्टो कारवर लक्ष ठेवले असता दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीची, वर्णनाची अल्टो कार क्रमांक (एम. एच.11 एके 1304) तांदूळ आळी येथे येताना दिसली. पथकाने कारला घेराव घालून, कार थांबवून आत बसलेल्या दोन इसमांकडे चौकशी करत कारची तपासणी केली असता कारमध्ये 36 हजार 606 रुपयांचा गुटखा आढळून आला. गुटखा व अल्टो कार असा एकूण 1 लाख 86 हजार 606 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत तो पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
या कारवाईमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार यांनी सहभाग घेतला.