
दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमधील तांबमळा येथील शासकीय गोडावूनच्या समोरील रस्त्यावर दि. गुरुवारी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास दोघा अनोळखी इसमांनी फिर्यादी कुंडलिक बबनराव निंबाळकर (वय ६५, व्यवसाय डेअरी शॉप, रा. तांबमळा, फरांदवाडी, ता. फलटण) या डेअरी शॉप चालविणार्या व्यावसायिकास पोलीस असल्याची बतावणी करत लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी निंबाळकर यांच्याकडील सोन्याची अंगठी व रोख १५ हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना आता सर्रास होऊ लागल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांसमोर लोटांगण घातलेय की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
या घटनेची माहिती अशी, गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तांबमळा येथील शासकीय गोडावूनच्या समोरील रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीची गाडी थांबवून त्यातील पावसाळी जर्कींग घातलेल्या इसमाने फिर्यादीस ‘मी पोलीस आहे, इथे मर्डर झाला आहे, त्याची चेकींग सुरू आहे’, असे सांगून फिर्यादीला आपल्या सर्व वस्तू रुमालात ठेवण्यास सांगितल्या. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्या खिशातील १५०००/-रुपये तसेच हातातील एक सोन्याची अंगठी काढून त्या रुमालावर ठेवली. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याच्याकडील सोन्याची अंगठी व रोख रक्कम १५०००/-रूपये असलेला रुमाल घेऊन पसार झाले.
या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.