
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या रोहित जाधव, छगन मदने या दोन टोळ्यांतील १३ जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
रोहित भीमराव जाधव या टोळीप्रमुखासह राहुल भीमराव जाधव, गौरव चाळासो भंडलकर, ऋतिक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो भंडलकर (सर्व रा. सरडे, ता. फलटण) हे पाच जण, तसेच छगन मोहन मदने या टोळीप्रमुखासह चेतन शंकर लांडगे, साजन नानासो चव्हाण (सर्व रा. सोनगाव बंगला, ता. फलटण), दीपक दत्तात्रय धायगुडे, आदेश सुखदेव जाधव, सूरज शिवाजी बोडरे, नीलेश सुनील जाधव, विक्रम ऊर्फ आप्पा लालासो जाधव (सर्व रा. सरडे, ता. फलटण) या आठ जणांवर अशा १३ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही टोळ्या वारंवार भिडत होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिस ठाणेचे प्रभारी सुनील महाडिक यांनी दोन्ही टोळ्यांना सातारा व पुणे जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावांची चौकशी पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी केली. त्यानुसार दोन्ही टोळ्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांच्या तडीपारीचा आदेश देण्यात आला आहे.
या कारवाईत अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, हवालदार प्रमोद सार्थत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, हवालदार वैभव सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.