निंबळक येथे पिस्टल काढून दहशत माजवणार्‍या माजी सैनिकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
शस्त्र परवान्याची मुदत संपल्यानंतर ते बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून कोणतेही कारण नसताना क्षुल्लक कारणावरून दहशत माजवण्यासाठी पिस्टल काढणार्‍या माजी सैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पंढरपूर ते पुणे रस्त्यावर निंबळक, ता. फलटण गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणात पोलिसांनी त्याच्याकडून पिस्टल, एक जिवंत काडतूस व कार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

दत्तात्रेय बाबू महारनूर (वय ४९, रा. वैष्णवी सिटी उरळी देवाची, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.

महारनूर हे आपल्या कारने पंढरपूर ते पुणे असा प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान निंबळक ता. फलटण गावचे हद्दीत कार व दुचाकी घासल्यावरून दुचाकीचालक विक्रम पोपट आडके व महारनूर यांचा वाद झाला. यावेळी महारनूर याने पिस्टल बाहेर काढले. याची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत पिस्टल जप्त केले.

पोनि सुनील महाडिक, सपोनी शिवाजी जायपत्रे, सागर अभंग, अविनाश शिंदे, अमोल चांगन यांनी ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!