दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे बुधवार, दि. २७ मार्चपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.) नवी दिल्ली यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून विविध देशांतील संशोधक या परीक्षेत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये गाझी युनिव्हर्सिटी तुर्की येथील प्रा. सचिन साळुंखे, इथोपिया येथील प्रा. जे मुरलीथरण, साऊथ कोरीया येथील प्रा. संबीत नाईक यांचा समावेश आहे. त्याच पद्धतीने भारतातील काही नामवंत विद्यापीठांतील प्राध्यापक जसे की सेंच्युरीअन युनिव्हर्सिटी उडीसा येथील प्रा. डॉ. प्रफुल्लकुमार पांडा, प्रा. डॉ. अशोक मिश्रा, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तामिळनाडु येथील प्रा. डॉ. चिन्मय प्रसाद मोहंती, बेहरामपुर युनिव्हर्सिटी उडिसा येथून ब्रज किशोर मिश्रा मार्गदर्शन करणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संशोधक त्यांचे शोधनिबंध सादर करतील, त्यामुळे हे संशोधन उपस्थितांसाठी खुले होणार आहे. या परीक्षेत सादर करण्यासाठी विविध संशोधकांचे मिळून जवळपास ५० शोधनिबंध सादर केले जातील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी दिली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आय.एस.टी.ई. नवी दिल्ली यांची मान्यता घेण्यात आलेली असून सर्व सहभागी संशोधकांना आय. एस. टी.ई. नवी दिल्ली यांच्या लोगोसहीत प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. तसेच सहभागी संशोधकांचे शोधनिबंध दर्जेदार ‘जर्नलस’मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संशोधकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आय. क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. शांताराम काळेल यांनी केले.
“इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऍडव्हान्समेंटस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी” च्या माध्यमातून पहिल्यांदाच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी त्यांचे शोधनिबंध सादर करण्यासाठी तसेच इतर संशोधकांचे शोधनिबंध ऐकण्याची व त्यामाध्यमातून फलटण व परिसरातील शेतकरी, उद्योजक यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळाली आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व महाविद्यालय समिती सदस्य तसेच प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांचे आभार मानले.