दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | सातारा |
भूसंपादनावेळी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येरवळे (ता. कराड) गावातील सुमारे नऊ शेतकर्यांकडून २० हजारांची लाच घेताना कराडच्या प्रांत कार्यालयातील दोघे कंत्राटी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. रामचंद्र श्रीरंग पाटील व दिनकर रामचंद्र ठोंबरे अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकर्यांकडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करताना विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे कराड कार्यालयातील उपविभागीय अधिकारी येथे मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी दोन्ही कंत्राटी लिपिक यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर लाच रक्कम स्वीकारताना दि. १९ रोजी आरोपी कंत्राटी लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदरील कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहा.पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, पो.ना. निलेश राजपूरे, पो.शि. विक्रमसिंह कणसे यांनी केली.