दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२३ | फलटण |
सासकल, ता. फलटण, जि. सातारा या गावामध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण चौकशीधीन असताना प्राथमिक सेवा-सुविधांपासून गाव वंचित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
वास्तविक पाहता ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ ही संकल्पना अनेक गावांमध्ये राबवली जात असताना सासकलमध्ये मात्र दोन स्मशानभूमी अस्तित्वात आहेत. एका बाजूला ‘सर्वांभूती ईश्वर एक’ असल्याची भावना धर्मशास्त्रामध्ये असल्याचे सांगत असताना वेगवेगळ्या समाजासाठी दोन स्मशानभूमी असणं हे विषमतेचे व जातीयतेचे लक्षण आहे. ही सगळी परंपरा मोडीत काढून ‘एक गाव, एक स्मशानभूमी’चा विचार रुजविण्याइतके सासकल गाव व गावातील प्रस्थापित समाज प्रगल्भ झालेला नाही, हेच दिसून येते.
विशेषतः गावच्या पूर्वबाजूला मागासवर्गीय समाजाच्या लोकांसाठीची स्मशानभूमी खडकावरती अस्तित्वात आहे. गावच्या पश्चिमेला मात्र इतर समाजासाठी असणारी स्मशानभूमी अस्तित्वात आहे. मात्र, सासकल ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारामुळे सदर स्मशानभूमीचे काम हे ढिसाळ झाले असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष मृतांना घेऊन जाणेसुद्धा शक्य नाही. सदर स्मशानभूमी ही सातबारावर असतानाही निश्चित ठिकाणी त्याचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणी काटेरी कुंपण वाढले आहे. याकडे सासकल ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे मृत व्यक्तींच्या देहाचीसुद्धा विटंबना होत आहे.
प्राथमिक सेवा-सुविधा उपलब्ध नसल्याने सासकल गावांमधील मृतांना प्रत्यक्ष मुख्य रस्त्यालगत दहन केले जात आहे. त्या ठिकाणी लोकांमध्ये व अबालवृद्धांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहन केले गेलेल्या जागेलगत काही लोक वास्तव्यास असल्याने त्या कुटुंबातील लहान बालके, महिला यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अर्जून भाऊसो फरांदे व आजूबाजूच्या इतर ग्रामस्थांनी पंचायत समिती फलटणच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. अंत्यसंस्कार केलेल्या जागेजवळ आपल्या शेत जमिनीमध्ये ग्रामस्थांनी आपले घरकुल बांधले असून सदर जागेवर मृतांचे अंत्यसंस्कार करू नयेत. यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती सदर अर्जामध्ये करण्यात आली आहे.