
दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । जीवंत काडतूसासह बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास देवरे आणि गणेेश देवरे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून या दोघांनाही रविवारी रात्री साडेअकरा वाजता अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा शहर परिसरात जीवंत काडतूसासह विनापरवाना पिस्टल सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बर्गे (वय ३0) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाहतूक नियंत्रण शाखेने नो पार्किंगची कारवाई करण्यासाठी एक दुचाकी (एमएच 0३ – बीझेड ५९९७) वाहतूक शाखेच्या कार्यालयात उचलून आणली होती. ती परत मिळावी म्हणून दुचाकीचालक विकास प्रल्हाद देवरे (वय २६, रा. दहिवड, पो. अंबवडे बुद्रूक, ता. सातारा) आणि गणेश हणमंत देवरे (वय ३५, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) हे दोघे सांयकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास येथे आले होते. यावेळी विकास देवरे हा अनावश्यक बडबड करु लागल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांना त्याचा संशय आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक पिस्टल जीवंत काडतूसासह बेकायदा आढळून आले. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर विकास देवरे आणि गणेश देवरे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देवून पाहणी केली आणि तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे करत आहेत.