शाहुपुरी घरफोडीप्रकरणी दोनजण जेरबंद


स्थैर्य, सातारा, दि.२९: शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघड केला असून याप्रकरणी दोनजणांना अटक केली असून संशयितांकडून सिंगापूर  देशाचे  65 डॉलर चलन व दागिने असा मिळून 26 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विपुल तानाजी नलवडे व 19 वर्ष राहणार पिलेश्‍वरी नगर करंजे सातारा, जीवा नारायण वानखेडे व 31 राहणार केसरकर पेठ सातारा (सोने विक्री करणारा एजंट) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्यात घरफोडी झाली होती. यामध्ये फिर्यादीच्या घरातील सोन्याचे दागिणे व सिंगापूर देशाचे परदेशी डॉलर चोरीस गेले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी भेट देवून घरफोडी चोरीची माहिती घेतली. घरफोडी झालेली पध्दत पाहता ही चोरी सराईत चोरटयाने केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलींग करुन अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती घेवू लागले. दि. 27 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पिलेश्‍वरी कॅनॉलवर बसला असून त्याच्याकडे परदेशी डॉलर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस तत्काळ त्याठिकाणी गेले. पोलिसांना पाहून संशयीत पळून जावू लागला. तथापि, पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडले.  त्याची चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ  सिंगापूर चलनाचे पन्नास, दहा व पाच असे तीन डॉलर मिळुन आले. ते गुन्हयाचे तपासाकामी जप्त करणेत आले आहेत. त्यानंतर आरोपीस पोलीस ठाणेत आणुन उर्वरीत मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने सोन्याचे दागिणे केसरकर पेठेतील एकास विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या स्टाफने या इसमाबाबत माहिती घेतली असता तो दि. 28 रोजी कराड येथून करंजेनाका, सातारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या स्टाफने करंजेनाका परिसरात सापाळा लावून संबंधितास ताब्यात घेवून चौकशी केली. प्रथम त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणून कौशल्याने तपास करता त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली. सदरचे सोन्याचे दागिणे कराड येथे ठेवले असले बाबत सांगितले. त्यानंतर कराड येथे जावून 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करुन आरोपी बाबत गोपनिय माहिती प्राप्त करुन दोन आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील सिंगापुर चलनाचे 65 डॉलर व 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे असा एकुण 26 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 3 दिवसाचे आत घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो. कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन पवार चालक राजकुमार जाधव, मनोहर वाघमळे यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!