
स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेलचालकाला अडवून त्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन आणि आठ हजारांचा मोबाईल असा 68 हजारांचा ऐवज लुटणार्या चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने लुटमारीत सहभागी असलेल्या संशयितांपैकी दोघांना अटक केली आहे. सहभागीपैकी एकजण अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे. लुटमार करणार्यामध्ये एकजण अनोळखी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, सौरभ मंडलिक आणि शेखर सर्वगोड अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयूर चंद्रकांत देशमुख (वय 25, रा. निसराळे, ता. सातारा) हा युवक हॉटेल व्यवसायिक असून शुक्रवार, दि. 19 रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरुन निघाले असताना त्यांना वाढे गावच्या हद्दीत असणार्या पुलाच्या पुढे सौरभ पोपट मंडलिक, शेखर रवींद्र सर्वगोड, एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. प्रतापसिंह नगर, ता. सातारा) आणि लाल रंगाचा शर्ट घातलेल एक अनोळखी मुलगा असे चौघांनी अडवले. या चौघांनी मयूर याला धक्काबुक्की, शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. चौघांनी त्याच्या हातातील आठ हजार रुपये किमंतीचा मोबाईल, मोटारसायकलची चावी, आणि गळ्याती दोन तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि ते पळून गेले.
याप्रकरणी मयूर देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला होता. यानंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा तलुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरु केला होता. डीबीला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये सहभागी असणार्या संशयितांची नावे समोर आली होती. त्यानुसार शोध घेतला असता पोलिसांनी शनिवार, दि. 20 रोजी सौरभ पोपट मंडलिक आणि शेखर रवींद्र सर्वगोड याला अटक केली. दरम्यान, तिसर्या संशयितालाही यावेळी ताब्यात घेण्यात आले मात्र, तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. चौथ्या अनोळखीचा शोध सुरु आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस नाईक सुजीत भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम, उत्तम पवार सहभागी झाले होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी करत आहेत.