
थेट WhatsApp वर मिळवा
अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई करत पतंजलीचे सुमारे वीस लाख रुपयांचे गायीचे तूप जप्त केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०३ नोव्हेंबर : अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान वितरकाकडून पतंजलीच्या २ हजार २७९ लिटर गायीचे तूप जप्त करण्यात आले असून, या तुपाची किंमत सुमारे २० लाख २० हजार रुपये आहे. चुकीचे लेबलिंग आणि भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईची व्याप्ती आणि इतर साठा
सध्या सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएने आक्रमक भूमिका घेतली आहे. या राज्यव्यापी कारवाईत १९ अन्नपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे ३ लाख ५३ हजार किलो वजनाचा आणि सुमारे ९ कोटी रुपयांचा अयोग्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
चुकीच्या लेबलिंगचा संशय
मेसर्स दिव्य महावितरक या पतंजलीच्या सुपर वितरकाकडून हा तूपसाठा जप्त करण्यात आला आहे. उत्पादनावर चुकीची माहिती व लेबलिंग असल्याच्या तसेच भेसळ झाल्याच्या संशयामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी तीव्र करण्यात आली आहे.





