मिशन सुधार मोहिमेचा दणका; राज्यातील २२ लाख रेशन लाभार्थ्यांचे धान्य बंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत राज्यभरातील २२ लाख ८१ हजारहून अधिक अपात्र लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०३ नोव्हेंबर : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ‘मिशन सुधार’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अपात्र नावे वगळणे, मृत व्यक्तींच्या नोंदी तपासणे आणि आधार पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. या विशेष पडताळणी मोहिमेत राज्यभरातील २२ लाख ८१ हजार ८२० लाभार्थ्यांचे धान्य तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे.

अनेक नागरिक रडारवर

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांकडून मिळालेल्या याद्यांच्या पडताळणीत शासकीय कर्मचारी तसेच विविध संस्थांचे प्रमुख आणि बचत गटाचे पदाधिकारी निदर्शनास आले आहेत. याशिवाय कर्ज मंजुरीसाठी किंवा इतर कारणांसाठी आयटीआर (आयकर रिटर्न) भरणाऱ्या अनेक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मानून त्यांचे नाव या योजनेतून कमी करण्यात आले आहे. दरम्यान, धान्य बंद झाले असले तरी संबंधित लाभार्थ्यांची शिधापत्रिका सुरूच राहणार आहे.

पुढील कारवाईचे संकेत

या मोहिमेमुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पुरवठा विभागाने यंत्रणेला सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही २० लाख ५१ हजारहून अधिक संशयास्पद लाभार्थी पुरवठा विभागाच्या रडारवर असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात अपात्र ठरणाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!