दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । बारामती । बौद्ध धम्म हा विज्ञानवादी असून; त्रिशरण, पंचशीलच्या माध्यमातून आपणास आदर्श जीवनपद्धतीची शिकवण देत असतो, आपण त्रिशरण, पंचशीलाच पालन केल्यास आपलं उज्वल भवितव्य घडू शकते, तसेच त्रिशरण, पंचशीलच पालन आपण केलं नाही तर भारतीय दंड संहिताचे (Indian Penal Code) कायदेशीर कलम लावून आपले जीवन उध्वस्त होऊ शकते, त्यामुळे त्रिशरण, पंचशील हे भारतीयांच्या जीवनाशी किती निगडित आहे हे तुलनात्मक सांगत असतांना, त्रिशरण, पंचशील म्हणजे आदर्श जीवन पद्धत होय असे प्रतिपादन मा. महेंद्र कदम (जामसुतकर) यांनी प्रमुख व्यक्ता या नात्याने केले.
बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. २४, मौजे मुंढर, ता. गुहागर, मुंबई-गाव शाखा यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध यांचा २५६७ वा जयंती महोत्सव जेतवन बुद्ध विहार येथे एम.जी.गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी पहिल्या सत्रात पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण मा. अध्यक्षांच्या हस्ते झाले, धार्मिक विधी विद्यार्थी विद्या विकास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक निलेशजी गमरे (पोलीस पाटील), प्राध्यापक उमेश जाधव आणि सहकारी यांनी सुमधुर आवाजात पार पाडला. सदर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अजित गमरे यांनी उत्तमरीत्या पेलवली, त्यावेळी त्यांनी दानशूर देणगीदारांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात मुले, मुली, महिला, पुरुष, बालक यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तद्नंतर संध्याकाळी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्यदिव्य मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात, बँजो, डीजेच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात बुद्धीविहार, पंचायत समिती कार्यालय ते संपूर्ण गाव अशी काढण्यात आली ज्यात आबालवृद्ध, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवली. तिसऱ्या सत्रात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवीधर, पदविकाधर अश्या विद्यार्थ्यांना, तसेच निवृत्त कर्मचारी, जेष्ठ नागरिक आणि आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवले अश्या सर्वांना शाल, पुष्पगुच्छ व उद्योजक भूषण पवार यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व चळवळीवर आधारित पुस्तके धम्मदान म्हणून देऊन सन्मानित करण्यात आले, त्यात IPS अधिकारी प्रदीप गमरे आणि गुहागर तालुका शिक्षण समिती सचिव प्राध्यापक उमेश जाधव, जेष्ठ साहित्यिक, कवी, पत्रकार राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सायंकाळी ६:०० वाजता विद्यार्थी विद्या विकास मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने सानिका राजेंद्र मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली बाल व महिला कलावंतांचा नृत्य कलाविष्कार कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फिटेल व कायमस्वरूपी हृदयात घर करून राहील असा सादर केला.
भूतो न भविष्यती असा चार सत्रातील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी विद्या विकास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक निलेश गमरे (पोलीस पाटील), उद्योजक भूषण पवार, सानिका राजेंद्र मोहिते, रमाई महिला मंडळ, गाव-मुंबई शाखांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी अथक परिश्रम घेतले त्यासर्वांचे अध्यक्ष एम.जी.गमरे यांनी अध्यक्षीय भाषणात आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.