प्रतिभावंत कवी अनिलकुमार कदम यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। फलटण । पुणे येथील वल्लरी प्रकाशनाच्यावतीने कवी, लेखक, साहित्यिक, मुक्त पत्रकार, मराठी मासिक दमयंतीचे कार्यकारी संपादक, दमयंती युट्यूब चॅनलचे मालक व संपादक अनिलकुमार कदम यांच्या कुमुदिनी प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिध्द गझलकार म. भा. चव्हाण व संतसाहित्य अभ्यासक पत्रकार डॉ. विद्याधर ताठे यांच्या हस्ते प्रतिभावंत कवी म्हणून अनिलकुमार कदम यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गझलकार म. भा. चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक पत्रकार डॉ. विद्याधर ताठे, कवयित्री, समिक्षक श्रीमती दीपाली दातार, सौ. सीमा कुलकर्णी, किरण इनामदार उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमती दीपाली दातार म्हणाल्या की, अनिलकुमार कदम यांच्या कविता अंत प्रेरणेतून, निर्मळ झरा वाहावा त्याप्रमाणे सहजपणे निर्माण झाल्या आहेत. मानवी भाव भावना व्यक्त करणारी कविता मनाला अंतर्मुख करते. ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण असलेल्या शेती, शेतकरी, शेतमजूर, पशुपक्षी, निसर्ग, शेती,सामाजिक स्थिती, मानवी नातेसंबंध या विविध मुल्यांची जोपासना करणार्‍या कवितेचे लेखन अनिलकुमार कदम यांनी केले आहे.

यावेळी अनिलकुमार कदम यांनी गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस, महापुर, महापुरामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर पाऊस या कवितेच्या माध्यमातून शेतकर्‍यांची अवस्था कविता वाचन करताना विशद केली. अनिलकुमार कदम यांची शैक्षणिक कृती संशोधन, विद्या मिळवू येथे व काव्यरंग हा कवितासंग्रह अशी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दैनिक शिवसंदेश, तरुण भारत, ऐक्य, मुक्तागिरी, ग्रामोध्दार, ललकारी, पुढारी, लोकमत, सकाळ, दमयंती अशा अनेक वृत्तपत्रांत, मासिके, साप्ताहिकात कथा, कविता, लेख, स्तंभलेखनमधून सुमारे पाचशेपेक्षा जास्त लेखन प्रसिद्ध झाले आहे.

प्रज्ञा कल्याणकर यांनी सुत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. संजीव कुलकर्णी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास राणी बावनकुळे, शमिका आजगावकर, स्वाती भोसले, मिनाक्षी शिलवंत, समिधा करमरकर इत्यादी साहित्य क्षेत्रातील कवी, साहित्यिक, लेखक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!