स्थैर्य, नाशिक , दि.०४: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन झाले. राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो अशा शब्दांत यांना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शासन प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. मनमिळावू म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.
नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्टस् , कामर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये दिवंगत सरग यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांची पदोन्नती होणार होती. त्यामुळे मीडिया जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यगचित्रकाराला आपण मुकलो आहोत.