दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । मुंबई । श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं असून अध्यात्माला सेवाकार्याची जोड देऊन मानवकल्याणाचा आदर्श निर्माण करणारं कृतिशील व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार, रुग्णसेवा, जलसंवर्धन, निसर्गसंवर्धन, ग्रामविकास, आपत्तीनिवारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी सेवाकार्याचा डोंगर उभा केलं. अशोकराव गोडसे पुण्याचं सांस्कृतिक वैभव होतं. त्यांचं निधन राज्याच्या अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, अशोकराव गोडसे यांनी वडील तात्यासाहेबांचा सेवाकार्याचा वारसा पुढे चालवला. गेली अनेक दशकं पुण्याच्या अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सक्रीय योगदान दिलं. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सुरु होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासात ते पुणे शहराच्या वाटचालीतील अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनदान दिलं. सुवर्णयुग सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांच्या आर्थिक विकासाला हातभार लावला. अशोकरावांनी राबवलेली मानवतेचं महामंदिराची संकल्पना सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देईल. पुणेकरांच्या मनात अशोकरावांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Back to top button
Don`t copy text!