पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, 26/11 चा अतिरेकी हल्ला आठवल्यावर आजसुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. सिमेवर काम करत असताना तेथे शत्रु कोण, मित्र कोण याची पूर्व कल्पना असते, परंतु अंतर्गत सुरक्षा करताना तेथे शत्रु कोण व मित्र कोण याची माहिती पोलिसांना नसते. कोणीही शुल्लक कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकतो. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहिद होण्याची संख्या वाढली आहे. पोलीसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा पोलीसांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकांनी पोलीसांना काम करताना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समस्यांचा विचार न करता उपलब्ध मनुष्यबळाचा व साधनसामुग्रीचा पुरेपुर वापर करुन तसेच शहिद जवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवून नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न अबाधित राखवा. तसेच गोरगरीब, दीनदलित महिला व बालकांना तत्पर व योग्य न्याय देवून आपले कर्तव्य पार पाडावे, हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. यावेळी संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली.

त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!