पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

समाजातील प्रत्येक नागरिकांनी पोलीसांना काम करताना सहकार्य करावे : शहिद जवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमारे ठेवून कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवावा

स्थैर्य, सातारा, दि.21 : पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक‍ अँचल दलाल यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, 26.11.2008 चा अतिरेकी हल्ला आठवल्यावर आजसुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. सिमेवर काम करत असताना तेथे शत्रु कोण, मित्र कोण याची पूर्व कल्पना असते, परंतु अंतर्गत सुरक्षा करताना तेथे शत्रु कोण व मित्र कोण याची माहिती पोलीसांना नसते. कोणीही शुल्लक कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकतो. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहिद होण्याची संख्या वाढली आहे. भारताची लोकसंख्या वाढली परंतु त्यामानाने पोलीसांची संख्या वाढली नाही, त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा पोलीसांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकांनी पोलीसांना काम करताना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समस्यांचा विचार न करता उपलब्ध मनुष्यबळाचा व साधनसामुग्रीचा पुरेपुर वापर करुन तसेच शहिद जवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमारे ठेवून कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवून नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न अबाधित राखवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी  पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविकात  माहिती दिली की, 31 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांनी आपल्या सिमेवर हल्ला केला होता. त्यावेळी केंद्रीय राखीव  दलातील शिपायांनी धैर्याने लढा दिला होता. त्यामध्ये 10 भारतीय शिपाई शहीद झाले. त्याची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस स्मृती दिन पाळला जातो. यामध्ये गत वर्षभरात म्हणजेच गेल्या 1 सप्टेंबर ते यंदा 31 ऑगस्ट पर्यंतच्या  कालावधीत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी,  कर्मचारी यांना  आदरांजली वाहण्यासाठी  हा दिवस पाळला जातो.  गेल्या वर्षभरात देशभरात 266  पोलीस अधिकारी व कर्मचारी शहिद झाले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रथम संपूर्ण देशभरातील गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले.   संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली.

त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली.  पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!