आदिवासी बांधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’चे औचित्य साधून पालघरच्या जव्हार तालुक्यातील विविध गांवामधील आदिवासी बांधव तसेच लहान मुलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत राजभवन येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

‘तारपा’ नृत्याने राज्यपालांचे स्वागत केल्यावर आदिवासी भगिनींनी राज्यपालांना राखी बांधली. यावेळी लहान मुलांनी सर्वधर्मसमभाव व विविधतेतून एकतेचा संदेश देणारे लघु नाट्य सादर केले.

आदिवासी बांधवांचे राजभवन येथे स्वागत करताना राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या तीन वर्षात आपण राज्यातील विविध आदिवासी भागांना भेटी दिल्या. पालघर – नंदुरबारचे असो किंवा ओरिसा – उत्तराखंडचे असो, आदिवासी बांधवांच्या भाषा – बोली वेगवेगळ्या असतील परंतु त्यांचे नृत्य समान आहे, संगीत समान आहे. या समानतेच्या धाग्याने सर्व आदिवासी बांधले आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.

देशात आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यशासन तसेच केंद्र शासन विशेष प्रयत्न करीत आहे. आदिवासी बांधवांनी शिक्षण, रोजगार व उद्यमशीलतेतून स्वतःचा विकास साधावा, मात्र आपली भाषा व संस्कृती जोपासावी, असे राज्यपालांनी सांगितले. समस्त आदिवासी बांधवांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे व आपली उन्नती साधावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या बांबू उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी वाळवंडा येथील वयोवृद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी राज्यपालांना संजय पऱ्ह्याड यांनी काढलेले वारली चित्र भेट दिले.

आदिवासीच्या राजभवन भेटीचे आयोजन नवीन शेट्टी संचलित क्रिश स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थेतर्फे करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!