
दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा । लग्नामध्ये उपस्थित नातलग, मित्रमंडळींना अक्षता न देता विविध झाडांच्या बियांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर त्या रुजविण्याचे आवाहन करत लग्न समारंभातूनच ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम येथील पाटील कुटुंबीयांनी राबवला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील चि. रणजित उर्फ अमर आणि सुपने (ता. कऱ्हाड) चि.सौ.का. मोनिका यांचा विवाह येथे मोठ्या थाटात झाला. या वेळी उपस्थितांना अक्षता वाटप न करता प्रत्येकाला विविध प्रकारच्या दहा झाडांच्या बियांची पाकिटे देण्यात आली. त्यामध्ये रेन ट्री, चिंच, गुलमोहर, बहावा, रिटा, शिरस आदींचा समावेश होता.
याचबरोबर त्यामध्ये माणसा माणसा एक तरी झाड लाव, वृक्षाचे करा संवर्धन धरतीचे होईल नंदनवन, बीज एक झाडे अनेक… अशाप्रकारचे संदेश लिहिलेहोते. झाडांच्या बियांचे बीजारोपण करून पर्यावरणाला हातभार लावू या हाच खरा वधू-वरास शुभाशीर्वाद, असा संदेशही देण्यात आला होता. लग्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या अक्षता अनाथाश्रमास दान करण्यात आल्या.
लोकांमध्ये वृक्ष संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण व्हावी. लहानपणापासून ऐकत आलो आहोत की झाडे आपले सर्वात चांगले मित्र आहेत, परंतु व्यावहारिक जीवनात झाडांना मित्र मानणारा कोणीही दिसत नाही. झाडे प्रत्येक जीवसृष्टीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ देतात. नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी त्यांचा खूप उपयोग होतो. त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यातून उतराई होण्याचा आमच्या कुटुंबीयांचा हा छोटासा प्रयत्न आहे.
अजित पाटील, वराचे बंधू.