
स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडका भाऊ’ योजनेतील प्रशिक्षणार्थींना, दिलेला कालावधी संपल्यानंतर कार्यमुक्त केले जात असल्याने त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कायमस्वरूपी रोजगाराच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी, श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी एकवटले असून, रोजगारासाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
श्री संत बागडेबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर ‘लाडका भाऊ’ या संकल्पनेतून महाराष्ट्रात १,३४,००० प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जोडले गेले होते. हा कालावधी संपल्यानंतर, रोजगारासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी आळंदी ते मुंबई पायी वारी काढली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. “आता ही मुदतवाढही संपत आली असून, निवडणुकीवेळी दिलेल्या कायमस्वरूपी रोजगाराच्या आश्वासनाऐवजी प्रशिक्षणार्थींना बेरोजगार केले जात आहे. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत,” असे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
या लढ्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना ‘मानवमित्र संघटने’चे सभासद करून एका छताखाली आणले जात आहे. या सभासद नोंदणी मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील ३,४४८ प्रशिक्षणार्थींच्या नोंदणीची जबाबदारी युवा प्रतिनिधी हिना अमन पानसरे यांच्यासह प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधींवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये फलटण तालुक्यासाठी भाग्यश्री चव्हाण, खटावसाठी प्रवीण माने, कराडसाठी राहुल कोळपे व अश्विनी माने आणि इतर तालुक्यांसाठी प्रतिनिधी काम पाहत आहेत.