स्थैर्य, कोरेगाव, दि.५ : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल या खाजगी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी रात्री ऊसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेन होलमधून अचानक गरम वाफ बाहेर आल्याने संभाजी शंकर घोरपडे वय ४५, रा. शिरढोण या कामगाराचा दुर्देवी मृत्यु झाला तर अन्य दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.
जरंडेश्वर शुगर मिल या खाजगी साखर कारखान्याचा सन २०२०-२०२१ चा गाळप हंगाम सुरु असून, शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ऊसाच्या गरम रसाच्या टाकीच्या मेन होलमधून अचानक गरम वाफ बाहेर येण्यास सुरुवात झाली, त्यामध्ये टाकीसमोर काम करत असलेले संभाजी शंकर घोरपडे हे गंभीररित्या भाजले. वाफेच्या तीव्र प्रवाहामुळे ते लांब फेकले गेले आणि त्यांच्या मेंदुला जबर मार बसला. त्यांच्यासमवेत याच विभागात काम करत असलेले अजित संजय साळुंखे वय २४, रा. जरेवाडी व साहिल बशीर मणेर वय २२, रा. कुमठे हे देखील जखमी झाले.
कारखान्याच्या मिल सेक्शनमध्ये काम करत असलेल्या अन्य कामगार, सुपरवायझर्स यांनी प्रसंगावधन राखून संभाजी घोरपडे यांना कारखान्याच्या वाहनातून सातारच्या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर घोरपडे यांना मृत घोषित केले. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
अजित संजय साळुंखे व साहिल बशीर मणेर यांना देखील तातडीने कारखान्याच्या वाहनातून कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघेही १८ ते २० टक्के भाजले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने आता प्रकृत्ती सुधारत आहे. संभाजी घोरपडे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर शिरढोण येथे आणण्यात आला. तेथे ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कामगार व नातेवाईकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मयत अशी नोंद झाल्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्याकडे तो गुन्हा तपासासाठी कोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी शनिवारी कारखान्यात ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणची पाहणी केली. हवालदार विजय जाधव व अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
संभाजी घोरपडे यांच्या मृत्युने अनेकांना धक्का
संभाजी शंकर घोरपडे यांचा मृत्यु मनाला चटका लावून जाणारा ठरला आहे. शिरढोण येथील शेतकरी कुटुंबातील घोरपडे यांनी स्वत:ला जरंडेश्वर साखर कारखान्यासाठी वाहून घेतले होते. कारखाना उभारणीवेळी भागभांडवल जमा करण्यापासून ते अहोरात्र काम करत होते. चाचणी गळीत हंगामामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील त्यावेळच्या व्यवस्थापनाने केला होता. अत्यंत शांत व संयमी असलेले संभाजी घोरपडे हे सर्वपरिचित होते. गावच्या सर्वांगिण विकासामध्ये त्यांचे योगदान होते. कारखान्यातील अन्य कामगारांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांचे कुटुंब स्थिरस्थावर असून, मुलगा व सून पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी करत असून, कन्या देखील पुण्यात स्थायिक झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा हार्ट ऍटेकने मृत्यु झाल्यानंतर ते मानसिकरित्या खचले होते. आपले दु:ख बाजूला सारुन ने अत्यंत चांगल्याप्रकारे कारखान्यात काम करत होते. त्यांच्या अचानक मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे. संपूर्ण शिरढोण गावावर शोककळा पसरली आहे.