५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । मुंबई । दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!