
दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२३ | सातारा | अजित जगताप |
कोरेगाव तालुक्यातील अंबवडे चौकात बाजारच्या दिवशी सुद्धा अपघाताचा बाजार भरत असल्याचे चित्र उघड्या डोळ्याने पाहायला मिळत आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हद्दीमधून वाठार स्टेशन परिसरातील अंबवडे गाव सध्या अपघातामुळे चांगलेच चर्चेत आलेले आहे. सातारा-लोणंद (नॅशनल हायवे क्रमांक ६१) रस्त्यावरील अंबवडे चौक येथे दर गुरुवारी भरणार्या आठवडा बाजाराची जागा बदलून दुसर्या ठिकाणी घेण्याबाबत सातत्याने तोंडी व लेखी मागणी केली जात होती. कारण या ठिकाणी बाजारच्या दिवशी सुद्धा अनेक वाहनांची ये-जा होत आहे. विशेषत: टोलमाफी व्हावी यासाठी जड वाहने याच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत आहेत. बाजारच्या दिवशी मोठी गर्दी होत असून रस्त्यालगतच बाजार भरत असल्याने भविष्यात मोठा अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून या विरोधात गुरुवार, दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी रस्ता रोको करणार असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी निवेदन दिलेले आहे.
रविवारी या ठिकाणी झालेल्या ट्रक व टाटा सुमो अपघातात आठवडा बाजारात फरसाण विक्री करणार्या गरीब कष्टकरी आई व मुलगा यांना गंभीर इजा झाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथील रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सदर महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.