पर्यटकांना एन्ट्री पॉईंटवर नाहक त्रास देऊ नये

आम्ही सातारकर संघटनेची मागणी ; पोलिसांनी घेतली तात्काळ दखल


स्थैर्य, सातारा, दि. 21 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांना एन्ट्री पॉईंटवर ट्रॉफिक पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असून जिल्हयातील पर्यटन वाढीसाठी ते त्रासदायक आहे. एन्ट्री पॉईंटवर ट्रॉफिक पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे ती बंद व्हावी या मागणीसाठी आम्ही सातारकर संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या मागणीची होम डीवायएसपी अतुल सबनीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधितांना पर्यटकांना नाहक त्रास होणार नाही याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे हे निवेदन मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सुध्दा देण्यात आले त्यांनी सुध्दा तात्काळ या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाला योग्य त्या सूचना केल्या. त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

आम्ही सातारकर ही संघटना सातारा जिल्ह्यातील रहिवाशांच्या हिताकरता पूर्ण राज्यभर असणारा शाखा विस्ताराच्या माध्यमातून कार्यरत आहे. नुकताच कास पठारावर पुष्प महोत्सवाची सुरुवात झालेली असून राज्यातील तसेच देशातील पर्यटक या महोत्सवासाठी व सातारा तसेच परिसरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी दूरवरून आवर्जून मोठा खर्च करून येत असतात. अशावेळी टोल नाका तसेच बोगदा परिसर व यवतेश्वर या ठिकाणी ट्रॉफिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची अडवणूक होत आहे. गाड्या अडवल्यानंतर त्या भागात ट्रॉफिकचा बोजवारा उडत आहे. वाहतूक शाखेचे काम वाहतूक सुरळीत करणे हे असताना यावर लक्ष केंद्रित न करता एमएच 11 हे पासिंग सोडून येणार्‍या सर्व गाड्यांना अडवले जाते व त्यांना नाहक त्रास होईल या पध्दतीने वागणूक दिली जाते.

एकाच वेळी पाच पाच ते दहा दहा गाड्या थांबवून दोनच पोलीस कर्मचारी उपलब्ध असताना सर्वांना थांबवून ठेवण्यात येते. यामुळे पर्यटनासाठी आलेल्या लोकांचा वेळ नको त्या गोष्टीसाठी वाया जातो आणि त्यांचा हिरमोड होत आहे. याबाबत अनेक तक्रारी आम्ही सातारकरच्या शाखा असणार्‍या विभागांमध्ये आल्या होत्या. त्यामुळे याबाबत इतर देशांमध्ये, देशातील पर्यटनस्थळांवर ज्याप्रमाणे पर्यटकांचे स्वागत केले जाते. अतिथी देवो भवची संकल्पना राबवली जाते त्यापध्दतीने सातारा जिल्ह्यात सुध्दा पर्यटकांच्या बाबतीत मानसिकता बदलायला हवी.
सातारा जिल्ह्याला सुध्दा निसर्गाची उधळण मुक्तहस्ताने झालेली असताना वर्षभर पर्यटक या स्थळांना कशा भेटी देतील यावर विचार करायला हवा. त्यामुळे एन्ट्री पॉईंटवर असणार्‍या ट्रॉफिक पोलिसांना सूचना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देतना आम्ही सातारकर संघनटेचे सातारा तालुकाध्यक्ष, अतुल काटकर, शहराध्यक्ष अमर बेंद्रे, साईप्रसाद पालकर, निलेश आपटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांकडून तत्काळ दखल

आम्ही सातारकर संघटनेच्या निवेदनाचे होम डीवायएसपी अतुल सबनीस यांनी तत्काळ दखल घेत, विषयाचे गांभीर्य ओळखून शहर वाहतूक निरीक्षक अभिजीत यादव, सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे साहेब यांना निवेदनातील मागणीबाबत माहिती देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या तत्परतेबद्दल आम्ही सातारकर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!