ऐतिहासिक ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’चा इतिहास पुनर्जिवीत करणार – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची सुरूवात याच मैदानातून केली होती. या मैदानाचा इतिहास पुनर्जिवीत करण्यासाठी या मैदानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ऑगस्ट क्रांती मैदानाचे सुशोभीकरण करण्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, येत्या ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी या मैदानाची तसेच परिसराची दुरूस्ती, पुनर्बांधणी तसेच सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यात यावीत. परिसरातील रस्ते, पदपथांची दुरूस्ती करून स्वतंत्रता मार्गाची रचना करण्यात यावी. पेव्हर ब्लॉकचा वापर न करता मैदानाची नैसर्गिकता कायम ठेवावी. त्याचप्रमाणे ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व दर्शविण्यासाठी सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागाने तज्ज्ञांचे पॅनल तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.

या परिसरात ऑगस्ट क्रांतीबाबत तसेच त्यामध्ये महाराष्ट्राच्या योगदानाबाबत माहिती दर्शविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!