स्थैर्य, औंध, दि. २३: देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पाहिलेले डिजीटल क्रांतीचे पर्व आजच्या युवकांनी सत्यात आणूूून डिजिटल संसाधनांचा वापर करून देशाची व समाजाची उन्नती साधावी असे आवाहन हरणाई सूतगिरणीचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केले.
येळीव येथील हरणाई सूतगिरणीत आयोजित माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निलेशराव घार्गे, हरणाईचे व्यवस्थापकीय संचालक रमेश भोसले व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयोजित प्रतिमा पूजन कार्यक्रमानंतर बोलताना देशमुख म्हणाले की, नव्वदच्या दशकात राजीव गांधी यांनी डिजीटलायजेशन इंडियाचे स्वप्न पाहिले होते . ते आज आपण साकारताना पाहतोय ,संगणक,मोबाईल क्रांती, डिजिटल बँकींग प्रणाली ,आधारकार्ड प्रणाली तसेच अन्य सुविधा ही सर्व त्या क्रांतीचीच फलित आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आपले जीवन उंचाविण्यासाठी प्रयत्न करावेत.यामाध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील .त्यासाठी शासकीय स्तरावर पाठबळ व मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आभार चंद्रकांतगिरी गोसावी यांनी मानले.